
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी पूरपरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा
पालकमंत्री जयकुमार गोरे: पंचनाम्यातून एकही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या
सोलापूर 24 ||
सोलापूर : जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा. पंचनामे करतांना एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्या, असे निर्देश ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरपरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे घेण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते.
यावेळी आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, प्रांत अधिकारी सदाशिव पडदुणे, सुमित शिंदे, सचिन इथापे, विजया पांगारकर, तंत्र अधिकारी सतीश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, अभियंता खांडेकर, सर्व तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री गोरे म्हणाले, अतिवृष्टी व पूरपरस्थितीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी विविध यंत्रणेनुसार तातडीने पंचनामे सुरू करावेत. पाऊस आणि पुराच्या पाण्याने जिल्ह्यातील नुकसान झालेल्या भागातील शेती, घरे, जनावरांचे तातडीने पंचनामे सुरु करावेत. या अतिवृष्टीमध्ये जीवित व वित्तहानीची परिपूर्ण माहिती तयार करावी. या कामासाठी आवश्यकतेनुसार गटविकास अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी, इतर तालुकास्तरीय अधिकारी-कर्मचारी यांची पथके गठीत करून पंचनामे कालमर्यादेत पूर्ण करावेत. त्याचा अहवाल शासनाकडे पाठवावा. राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. पुरस्थितीमुळे काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दुषित झाल्याची शक्यता आहे. त्याठिकाणी आवश्यक उपाययोजना कराव्यात. पूरग्रस्त भागात आरोग्यविषयक आजार होणार नाहीत, यासाठी खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही पालकमंत्री गोरे यांनी दिल्या आहेत.
यावेळी त्यांनी पंढरपूर तालुक्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे स्थलांतरित कुटुंबाच्या मदतीबाबत माहिती घेतली.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरस्थितीमुळे नुकसानीबाबतची, उजनी धरणात येणाऱ्या पावसाच्या पाण्याची व विसर्ग होणाऱ्या पाण्याची माहिती दिली. अतिवृष्टी व पूरपरस्थितीमुळे निमार्ण झालेल्या परस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपययोजनाची माहिती दिली.
जिल्ह्यात 47 हजार 804 हेक्टर पिकांचे नुकसान
जिल्ह्यात दि.1 ऑगस्टपासून आतापर्यंत अतिवृष्टी व पूरपरस्थितीमुळे 172 गावे व 46 हजार 348 शेतकरी बाधित झाले आहे. या शेतकऱ्यांचे 47 हजार 804.34 हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सर्वाधिक दक्षिण सोलापूर तालुक्यातील 18 हजार 471 हेक्टरचे नुकसान झाले. उत्तर सोलापूर तालुक्यातील 14 हजार 4, माढा तालुक्यात 8 हजार 721 तर पंढरपूर तालुक्यातील 5295 हेक्टरवर नुकसान झाले आहे. पूरस्थितीत 3 जनावरे दगावली. अक्कलकोट 45, दक्षिण सोलापूर 2 व माळशिरस 1 अशा 48 घरांची पडझड झाली आहे. जिल्ह्यात उत्तर सोलापूर तालुक्यातील सोलापूर, शेळगी, मार्डी, वडाळा, तिर्ऱ्हे तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी, मुस्ती व अक्कलकोट तालुक्यातील किणी मंडळात अतिवृष्टी झालेली आहे.
Post Comment