breaking

‘तेने कन्टे मधुरमैना तेलुगू भाषा : ॲड. श्रीनिवास क्यातम

पद्मशाली सखी संघमतर्फे तेलुगू भाषा दिन साजरा

सोलापूर 24||

सोलापूर :  ‘आपण कितीही मोठे झालो, तरीही ‘मातृभाषा’ विसरु नये’ असे प्रतिपादन पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. श्रीनिवास क्यातम यांनी केले आहे. श्री मार्कंडेय सोशल फाऊंडेशन संचलित पद्मशाली सखी संघमच्यावतीने दाजीपेठेतील श्रीराम मंदिरात तेलुगू भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

ॲड. श्रीनिवास क्यातम पुढे म्हणाले, तेलुगूमध्ये म्हटले जाते, ‘तेने कन्टे मधुरमैना तेलुगु भाषा’. अर्थातच, ‘तेलुगू भाषा मधाहूनही गोड’. म्हणून याला विसरु नयेत. सोलापुरातील पूर्व भागातील तेलुगू भाषिक मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये म्हणून सध्या तेलुगूमधून संवाद करण्याचे बंद केलेले आहेत. किमान घरात असताना तेलुगू भाषेतूनच संवाद साधावेत. हा एक अत्यंत ज्वलंत प्रश्न तेलुगू भाषेसमोर उभा आहे. सोलापुरातील जुन्या पिढीच्या अनेक लोकांना वाचता येत नाही, बोलता येते. सध्याच्या लहान मुलांना तेलुगू भाषा कळतेय, परंतु लिहिता,वाचता, बोलता येत नाही. भविष्यात हीच परिस्थिती राहिली तर सोलापूरच्या पूर्व भागात पूर्वी तेलुगू भाषिक असायचे, असे म्हणण्याची वेळ येऊ नये. अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

telugu-bhasha-din-300x176 'तेने कन्टे मधुरमैना तेलुगू भाषा : ॲड. श्रीनिवास क्यातम

कारण, तिसरी पिढी संपण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांत तेलुगू भाषिक असूनही त्यांना  तेलुगू भाषा बोलता येत नाही. म्हणून प्रत्येकाने मातृभाषेचा अभिमान बाळगावा. जगात चौथ्या क्रमांकावरील बोली भाषा म्हणून ‘तेलुगू भाषा’कडे पाहिले जाते. जगातील कानाकोप-यात तेलुगू भाषिक आहेत. याबद्दल अभिमान वाटतो. म्हणून आपण कितीही मोठे झालो तरीही मातृभाषा विसरु नये.असे आवाहन ॲड. श्रीनिवास क्यातम यांनी केले.

याप्रसंगी पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्षा मेघा इट्टम, संस्थापक गौरीशंकर कोंडा, कला महाविद्यालयाचे अध्यक्ष श्रीनिवास यनगंदूल,  दयानंद कोंडाबत्तीन, उपाध्यक्षा कल्याणी पेनगोंडा, समन्वयिका सुनिता क्यामा-निलम, वनिता सुर्रम, पल्लवी संगा, हेमा मैलारी, सुप्रिया मासम, सुलोचना माचर्ला, लक्ष्मी यनगंदूल, मंजुळा दुधगंडी, श्रावणी कनकट्टी, संगीता सिद्राल आदी उपस्थित होते.   कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष श्रीनिवास कामुर्ती,  समन्वयक किशोर व्यंकटगिरी, वम्सी पल्ली  यांनी परिश्रम घेतले.

ॲड. क्यातम यांनी सुरुवातीपासून तेलुगू भाषेतूनच संवाद साधला, हे विशेष. ॲड. क्यातम म्हणाले, तेलुगू कवी, स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि तेलुगू भाषेचे जनक असलेल्या ‘गिडगू वेंकट रामामूर्ती’ यांचा जन्मदिन दि. २९ ऑगस्ट रोजी रोजी आहे. त्यांच्या सन्मानार्थ ‘तेलुगू भाषा दिन’ म्हणून  साजरा केला जातो. आंध्रप्रदेश राज्य संयुक्त असताना त्यावेळच्या आंध्रप्रदेश सरकारने १९६६ साली पहिल्यांदा साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून दरवर्षी कवी गिडगू वेंकट रामामूर्ती यांच्या जन्मदिनी ‘तेलुगू भाषा दिन’ साजरा केला जात आहे.

तेलुगू भाषा ही जगातील सर्वात जुनी व सर्वाधिक बोलणारी भाषा म्हणून याकडे पाहिले जाते. ती तेलंगणा व आंध्रप्रदेश या राज्यांची अधिकृत भाषा सुध्दा आहे.  ‘तेलुगू भाषा’ जगातील जुनी व द्रविड भाषांपैकी एक आहे. त्याचा प्रचार व प्रसार, भाषेत सुधारणा करण्यासाठी ‘गिडगू वेंकट राममूर्ती’ यांनी स्वतःचे आयुष्य वेचले आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त दि. २९ ऑगस्ट रोजी ‘तेलुगू भाषा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

Post Comment