breaking

सोलापूर शहरात ४८ हजार कुटुंबांना हक्काचे घर देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

सोलापूर 24||

सोलापूर : सोलापूर शहरात ४८ हजार कुटुंबांना हक्काचे घर देण्याचे नियोजन आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दहिटणे, शेळगीतील १ हजार ३४८ सदनिकांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केवळ सोलापूरमध्ये ४८ हजार घरांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी २५ हजार घरांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. २० हजार घरांचे नगारिकांना वितरीत केले. उर्वरित घरांचे काम सुरू आहे. यासाठी  पंतप्रधानांनी १ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गरिबांच्या घराचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,  देशाला नवीन दिशा देणारे आणि नवभारताचा पाया रचणारे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी  यांच्या स्मरणार्थ  प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण संस्थेने सुंदर गृहनिर्माण प्रकल्प साकारला आहे. गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत अतिशय सुंदर घरांची निर्मिती करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात  शिक्षण, आरोग्य, रोजगाराच्या समस्या दूर करतांना सामान्य माणसाला  हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली. त्याअंतर्गत पीपीपीच्या माध्यमातून काही प्रकल्प हाती घेण्यात आले, त्यातील हा प्रकल्प आहे.

 या प्रकल्पाला अटल बांधकाम योजनेतून २ लाख रुपये देण्यात आले आहे. हरितपट्टयात मान्यता दिल्याने जागेची किंमत कमी झाली. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अनुदान मिळाले. त्यामुळे लाभार्थ्याला कमी दरात घरकूल उपलब्ध झाले आहे. लाभार्थ्याला घरभाडे एवढाच बँकेचा हप्ता भरावा लागणार आहे. घर त्याच्या नावाने होईल, असे नियोजन करण्यात आले आहे. 

Post Comment