
सोलापूरच्या नदीम शेखची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड
बंगळुरू येथील निमंत्रितांच्या ४ दिवसीय क्रिकेट स्पर्धेत खेळणार
सोलापूर 24||
सोलापूर : जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू, तेज मध्यमगती गोलंदाज नदीम शेख याची महाराष्ट्र रणजी संभाव्य संघात निवड झाली आहे. हा संघ येत्या दि. ४ सप्टेंबरपासून (KSCA) अर्थात कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्यावतीने बंगळुरू येथील निमंत्रितांच्या ४ दिवसीय क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणार आहे. या संघाचे नेतृत्व रणजी खेळाडू मंदार भंडारी करणार आहे.
उजव्या हाताचा गोलंदाज असलेला सोलापूरचा नदीम शेख हा गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा संघाकडून उत्तम कामगिरी करत आहे. त्यामुळे त्याची रणजी संभाव्य संघ आणि सराव शिबिरासाठी निवड झाली आहे.
मागीलवर्षी देखील KSCA कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित इंडिया डॉ.(कॅप) के. थिम्मापैयाह मेमोरियल क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळताना त्याने चांगली कामगिरी केली होती. यावर्षी खील वरिष्ठ गट मुलांच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत सोलापूर जिल्ह्याकडून खेळताना त्याने उत्तम कामगिरी केली आहे. सोलापुरात डी.बी. देवधर क्रिकेट स्पर्धेत देखील त्याने चांगली कामगिरी केली आहे. नुकतेच पुणे येथे झालेल्या रणजी सराव शिबिरासाठी त्याची निवड करण्यात आली होती. येथील सराव शिबिरातून चेन्नई, बंगळुरू येथील स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ सहभागी झाले आहेत. सन २०२५-२६ या आगामी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा रणजी चषकासाठी यातून महाराष्ट्राचा मुख्य संघ निवडला जाणार आहे. त्याची पूर्व चाचणी/तयारी म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जात आहे.
महाराष्ट्र संघ हा KSCA प्रेसिडेंट संघ, गोवा व विदर्भ संघांसमवेत या स्पर्धेत सामने खेळणार आहे. या २५ दिवसांच्या स्पर्धेसाठी संघ बंगळुरू येथे पोहोचला आहे.
नदीम शेख याच्या निवडीबद्दल सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, सचिव खासदार धैर्यशील मोहिते- पाटील, अध्यक्ष माजी आमदार दिलीप माने, व्हाईस चेअरमन श्रीकांत मोरे, संयुक्त सचिव चंद्रकांत रेम्बर्सू, इतर पदाधिकारी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
Post Comment